स्वामीनामाच्या जयघोषाने अक्कलकोट नगरी दुमदुमली   

प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा 

सोलापूर, (प्रतिनिधी) : जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थच्या जयघोषात परंपरेप्रमाणे अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उन्हाची चटके असतानाही लाखो भाविकांची दर्शनासाठी झालेली गर्दी हे यंदाच्या प्रकट दिनाचे वैशिष्ट्य ठरले. पहाटे दोन वाजल्यापासून जी गर्दी सुरू झाली ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. स्वामीनामाच्या जयघोषाने अक्षरशः अक्कलकोट नगरी दुमदुमून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
 
भर उन्हात देखील दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांग लागली होती. पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  झाली.  सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात आले. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे परिसर भक्तीमय बनला होता. स्वामींचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. 
 
अभिषेकाची पावती करणार्‍या स्वामी भक्तांना खडीसाखरेचा प्रसाद देण्यात आला. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले. सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम होवून जन्म दिन सोहळा झाला. भजनगीत व मंदार महाराज व मोहित महाराज यांनी सादर केले. प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती झाली. सर्व स्वामी भक्तांना सुंठवडयाचा प्रसाद देण्यात आला. 
 
दरम्यान दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी - गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे प्रसाद देण्यात आला. दुपारी ४ ते ६ या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पुण्यातील गायिका जया कर्णिक यांची गायनसेवा झाली. आमदार सचिन  कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, पुण्यातील उद्योगपती विशाल धुमाळ,नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड आदींसह हजारो  भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. 
 
सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे व कर्मचारी, सेवेकरीसह पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते. याप्रसंगी प्रदीप हिंडोळे, बाळासाहेब घाटगे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, शिवशरण अचलेर, बसवराज आलमद, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके, रामचंद्र समाणे, महेश मस्कले आदींसह असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते. 

मंडपाची व्यवस्था 

भाविकांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी दर्शन रांगेत कापडी मंडपाची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात करण्यात आली होती. भाविकांसाठी दक्षिण महाद्वार व मुरलीधर मंदिर समोर पादत्राण कक्षाची सोय करण्यात आली होती. वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती.

भाविकांची संख्या मोजण्यासाठी डिजिटल यंत्रणा

अक्कलकोटमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेऊन राज्यात प्रथमच भाविकांची संख्या मोजणारे यंत्र लावण्यात आले होते. यावरून अक्कलकोटला उत्सव काळात येणार्‍या भाविकांचा निश्चित असा आकडा समोर येणार आहे. या सर्व यंत्रणावरती मुख्याधिकारी रमाकांत डाके हे लक्ष ठेवून होते.
 

Related Articles